पदर हा शब्द किती व्यापक आहे नाही ?
जगात पाऊल टाकलं की आपली पहिली ओळख या पदराशीच होत असते.पदरा खाली घेऊन आई जेव्हा तान्ह्या मुलाला दूध पाजते तेव्हा तिच्या पदराशी लडिवाळ चाळा करतच लहानाचं मोठं होत असतो.अगदी रस्त्यावर बसलेल्या गरीब बाईच्या फाटक्या तुटक्या पदराखाली आणि महालात असलेली एखादी श्रीमंत स्त्री ही देखील भरजरी पदराखाली बाळाला दूध पाजते.दोघींमध्ये काहीच फरक नसतो कारण दोघीही आपल्या बाळाला अमृतकुंभच पाजत असतात.दोघींचं मातृत्व आणि ममत्व एकाच उंचीच असतं!चालू लागलो की आईच्या पदराचं टोक घट्ट पकडून ती आपल्याला पडू देणार नाही असा आश्वासक भाव मनात असायचा.अगदी लहानपणी वडिल रागावले की आईच्या पदरामागे लपून बसण्यात एक विश्वास वाटायचा की ती आपल्याला वाचवून घेईल.लहानपणी आईच्या पदराला हात पुसणं नाक पुसण्यात जो आनंद होता तो कशात नव्हता .आईचा पदर हा लहानपणा पासूनच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असायचा.
पदर अनेकार्थाने वापरला जातो.दुपोडी पोळीला पदर सुटला की नाही.चिरोट्याला जितके पदर सुटतील तितका पाक चांगला आत शिरतो .
' पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा। आई मला नेसव शालू नवा 'यासारखी अनेक गाणी गाजलेली आहेत. पदर हा लाज झाकण्या साठी पण वापरला जायचा.तर पदर अंगाखांद्या वर पांघरून विनम्रता दर्शवली जायची.गावाकडे तर घरातील मोठ्या माणसांसमोर डोक्यावरून पदर घेतल्याशिवाय बाहेर यायचं नाही अशी सूचना असायची.खांद्यावरचा पदर ढळला तर ती बाई उच्छृंखल मानली जायची. पदराशी चाळा करणं हा बायकांचा आवडता खेळ .पदराला गाठ मारणं काही विशिष्ट गोष्टीची आठवण राखण्यासाठी पण केलं जायचं .ओटी भरतांना ती पदरातच घेतली जायची.तर अडीअडचणीला पदरचे पैसे घालून असं ही म्हटलं जायचं .
' पदरी पडलं आणि पवित्र झालं 'ही म्हण तर सर्वांना माहित आहेच .मी पदर पसरते बाई सांभाळ करावा हीच विनवणी बाई अशी विहीण लग्नात म्हणताना लहानपणी ऐकली पण तिचा खरा अर्थ मोठं झाल्यावर कळला. पूर्वी लग्नात विहीण म्ह्टलं जायची जी काळाला अनुसरून होती.पण आता असं होतांना दिसत नाही.एक तर विहीणी विहीणीचं नातं बदललं .आणि आता पदर पण नाही ओढणीत घ्यावी बाई(खैर हा विनोदाचा भाग)परंतु अगतिकतेचा कळस म्हणजे ही विहीण.खरंतर संत स्त्रियांनी जनाबाईंनी पण बाहेर जाण्यासाठी भर बाजारी डोईवर पदर घेऊन मी जाईन असं बंड केलं होतं.
बायका साडी घेतांना नेहमी पदर उलगडून दाखवायला लावतात आणि मगच साडी पसंत करतात.साडी कशी आहे यापेक्षा तिचा पदर कसा आहे यावर साडी घ्यायची किंवा नाही हे ठरायचं.घरात लग्न ठरलं की पदर खोचून कामाला लागा.अशी मोठे लोक सूचना देत असतात.वेगवेगळ्या राज्यात पदर घेण्याची विशीष्ट पद्धत असते.पदर संस्कृतीची झलक असते.पदर ही स्त्रीची ओळख असते ,मर्यादेचे रक्षण असते.पदर हे स्त्रीचे भूषण असते. आभूषण असते!