यातील प्रत्येक विषयावर स्वतंत्र पुस्तक लिहिता येईल; आणि खरोखरच यातील प्रत्येक विषयावर अनेक ग्रंथ लिहिले गेले आहेत.
पण जर मी तुम्हाला सांगितले तर की एक असे पुस्तक आहे ज्यामध्ये हे सर्व विषय (आणि इतरही अनेक!) बऱ्यापैकी सविस्तरपणे मांडले आहेत?
आणि गंमत म्हणजे त्या पुस्तकाचा मुख्य विषय भौतिकशास्त्र किंवा विश्वशास्त्र (cosmology) नसून, 'मानवी मन आणि आत्मचेतना' या गोष्टी सध्याच्या संगणकीय अल्गोरिदम्सच्या 'निश्चिततावादी' (deterministic) स्वरूपाच्या पलीकडील आहेत, हा विचार मांडणे हा आहे!
चला तर मग – सर रॉजर पेनरोझ (FRS) यांनी लिहिलेल्या Emperor’s New Mind या पुस्तकाची ओळख करून घेऊयात. सर रॉजर पेनरोझ हे सद्यकाळातील प्रमुख गणितीय भौतिकशास्त्रज्ञांपैकी एक आहेत. त्यांनी प्रगत गणितामध्ये पेनरोझ त्रिकोण, ट्विस्टर सिद्धांत आणि पेनरोझ टाईल्स अशा अनेक संकल्पनांचा शोध लावला आहे. या व्यतिरिक्त त्यांनी कृष्णविवरे (black holes), सिंग्युलॅरिटीज, सापेक्षता सिद्धांत यांवरील महत्त्वपूर्ण संशोधनात स्टीफन हॉकिंग यांना सहाय्य्य केले आहे.
पुस्तकाची सुरुवात होते ती न्यूटोनियन भौतिकशास्त्र, सापेक्षतेचे विशेष आणि सामान्य सिद्धांत, गणिताचे तत्त्वज्ञान आणि मर्यादा, क्वांटम भौतिकशास्त्र, विश्वशास्त्र, अवकाश-काळाचे स्वरूप आणि मानवी मेंदूची रचना अशा विविध संकल्पनांच्या आढाव्याने. प्रत्येक प्रकरणात, लेखक या सर्व संकल्पना पुस्तकाच्या मुख्य विषयाशी कशा जोडल्या गेल्या आहेत, हे सांगतात.
पेनरोझ यांच्या मते, मानवी विचार समजून घेण्यात क्वांटम संगणक महत्त्वाची भूमिका बजावेल.
लेखकाने स्वतःच्या प्रस्तावनेतच प्रांजळपणे कबूल केल्याप्रमाणे, त्यांनी या पुस्तकात समीकरणे आणि सूत्रांचा मुक्तपणे वापर केला आहे. या पुस्तकाचा आशय आणि स्वरूप पूर्णतः समजून घेण्यासाठी भौतिकशास्त्र व गणिताची चांगली पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे.