Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • अवर्गिकृत

उमटती ज्ञानाची पाऊले….

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
Art by Amit Borkhade

वर्गात शिरताच सर्वात प्रथम नजरेत भरतो तो म्हणजे काळ्याभोर रंगाचा फलक आणि त्यावर लिहिलेला रोजचा नवीन सुविचार !

विद्यार्थ्यांच्या दिवसाची सुरुवात एका उत्तम विचाराने करून देणारा हा फलक आणि त्यावर केलेले लेखन शिक्षक आणि विद्यार्थी यांना परस्पर जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक हे नातं फार विलक्षण असतं. त्यांच्याकडे बघणाऱ्यांना यातलं मर्म जाणवेलच असं नाही पण शिक्षकांना मात्र याची जाणीव असते.

जरी या वर्तमानाला कळेना आमुची भाषा

विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही

कवी सुरेश भट यांनी वरील ओळींमध्ये म्हटल्याप्रमाणे छोट्या छोट्या कृतींमधून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं, शाळेत घडणाऱ्या लहान लहान गोष्टी त्याच्या भविष्यातल्या व्यक्तिमत्त्वाची बांधणी करत असतात याची जाणीव ठेवून शिक्षक अध्यापन करीत असतात.

खरंतर जे शिकायचं आहे त्यातला ऐंशी टक्के भाग हा पाठ्यपुस्तकांमध्ये लिहिलेलाच असतो. पण जेव्हा तो भाग शिक्षक वर्गात शिकवतात आणि शिकवताना फळ्यावर लिहितात तेव्हा विद्यार्थी त्या पाठ्यभागाकडे जास्त एकाग्र होतात. शिक्षकांचे व्यक्तिमत्त्व, विषय शिकवण्याची हातोटी, लहानातल्या लहान गोष्टींचा शैक्षणिक साहित्य म्हणून केलेला कौशल्यपूर्वक उपयोग, विद्यार्थ्यांविषयीचा जिव्हाळा या सगळ्या गोष्टींचा एकत्रित परिणाम विद्यार्थ्यांवर होत असतो. फळा आणि खडू म्हणजेच ‘ फलक लेखन’ याचा उत्तम उपयोग कुशल शिक्षक करताना दिसतात. शिक्षकांनी शिकवायला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घडामोडी त्यांच्या मनाभोवती पिंगा घालत असतात. मित्र-मैत्रिणी, खाऊ, भ्रमणध्वनीवर बघितलेले, ऐकलेले दृश्य, गाणी असे अनेक क्रियाकलाप

त्यांच्या भोवताल घोंगावत असतात. या सगळ्यांमधून त्यांना बाहेर काढून जे शिकवायचे आहे त्या पाठ्य भागाकडे त्यांचे मन वळवण्यासाठी फलकलेखन हे अतिशय महत्त्वाचे शैक्षणिक साधन शिक्षकांच्या कामी येते.

पाठ्यांशाचे नाव फळ्यावर लिहिले की विद्यार्थ्यांना हे स्पष्ट होते की आता नेमके कशाचे अध्ययन करायचे आहे. पाठ्यांशाचे नाव वाचताच त्यांना माहित असलेले त्यासंबंधीचे सगळे दुवे जुळायला लागतात. मनात चाललेले असंख्य विषयांवरचे अगणित विचार फलक लेखन बघितल्यानंतर हळूहळू कमी कमी होत जातात आणि विद्यार्थी पाठ्यांशाच्या अनुषंगाने विचार करण्यास प्रवृत्त होतात. फलकलेखन हे विद्यार्थ्यांसमोर असलेले झाड, फांद्या, झाडाची पाने, फुले, त्यावर बसलेला पक्षी हे सगळे विसरायला लावून फक्त ‘पक्षाच्या डोळ्याकडे’ ‘अर्जुनाप्रमाणे’ एकाग्र होण्यासाठी मदत करतं.

फलकलेखन म्हणजे शिक्षकाच्या मनाचा आरसा!

त्यांच्या फलकलेखन पद्धतीत त्यांच्या गुरुत्वाचं प्रतिबिंब उमटतं. विद्यार्थ्यांच्या मनावर ते लेखन अक्षरशः कोरलं जातं. एक एक पायरी समजवत जेव्हा शिक्षक फलक लेखन करता करता शिकवू लागतात तेव्हा विद्यार्थी आकलनाची एक एक पायरी चढत असतात.

फलकलेखन हे जर उत्तम हस्ताक्षरात असेल तर उत्तम हस्ताक्षराचं महत्त्व वेगळ्यानं समजावून सांगण्याची गरजच उरत नाही. उत्तम हस्ताक्षर वाचण्यास किती छान वाटतं, किती सहज वाटतं.‌…. याचा विद्यार्थी रोजच अनुभव घेतात आणि कळत नकळत स्वतःही उत्तम हस्ताक्षरात लिहिण्यास प्रेरित होतात.

वर्गामध्ये तीन प्रकारचे विद्यार्थी दिसतात. ‘तल्लख बुद्धिमान’ हा पहिला प्रकार.

हे विद्यार्थी फलक लेखनामुळे नेमके महत्त्वाचे काय आहे, जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला उत्तरांमध्ये नेमक्या कोणत्या संकल्पना, कोणते शब्द , कोणत्या आकृत्या शिक्षकांना अपेक्षित आहेत याचा अचूक आडाखा बांधू शकतात. काही चाणाक्ष विद्यार्थी फलकलेखन जसेच्या तसे आपल्या वहीत टिपून ठेवतात व त्याच्या आधाराने आदर्श उत्तरे तयार करून शिक्षकांची शाबासकी मिळवून उत्तम गुण पटकावतात.

दुसऱ्या प्रकारचे विद्यार्थी म्हणजे ‘मध्यम’ विद्यार्थी.

ते खूप अभ्यास करत नाहीत पण साधारण गुण मिळतील इतपत अभ्यास करण्याचे तंत्र त्यांना अवगत असतं. फलकलेखन जर उत्तम असेल तर हे विद्यार्थी जो थोडा अभ्यास करतात त्या अभ्यासासाठी त्यांना उत्तम दिशा मिळते आणि ते आपला गुणतक्ता सांभाळण्यासाठी प्रयत्न करतात.

तिसऱ्या प्रकारचे विद्यार्थी असे आढळतात की ते पुस्तकांमधील मोठी मोठी वाक्यं ,परिच्छेद ,अवघड शब्द, आकृत्या पाहूनच दडपून जातात. त्यांना पुस्तकांशी मैत्री करणं साधत नाही. पण शिक्षक जे शिकवतात ते मात्र त्यांच्या स्मरणात राहतं. शिक्षकांच्या हस्ताक्षरात लिहिलेले फळ्यावरील शब्द ,आकृती ते वहीत उतरवून घेऊन त्याचा उपयोग करून थोडाफार का होईना अभ्यास करतात. उत्तरे लिहिताना त्यांना पुस्तकातील वाक्यं आठवत नसतील पण वर्गात शिक्षकांनी शिकवलेलं व फळ्यावर लिहिलेलं त्यांना स्पष्ट आठवतं. त्या फलक लेखनाचा आधार घेऊन ते यथामती उत्तरे लिहितात आणि अपयश टाळतात.

फलक लेखनामुळे शिकवण्यातील तोच तोचपणा टाळला जातो. पुस्तक आणि शिक्षक नेहमीचेच असतात. फलकलेखन मात्र रोज आपले वैविध्य व नाविन्य जपत असतं. फलक लेखनामुळे शिक्षक आपले अध्यापन अतिशय रंजक आणि कलात्मक बनवू शकतात. ‘श्रावणमासी हर्ष मानसी’ ही कविता शिकवताना श्रावण महिन्यातील निसर्गाचे रूप फळ्यावर साकारता येतं. ते चित्र श्रावणाला वर्गात जिवंत करतं.

फळ्यावर उतरलेला श्रावण थेट विद्यार्थ्यांच्या मनात शिरतो आणि जेव्हाही ते ती कविता वाचतात तेव्हा त्यासोबतच तो फळ्यावरचा श्रावण त्यांना लगेच आठवतो.

विज्ञान विषयामध्ये ‘मानवी हृदयाचे’ कार्य शिकवताना पुस्तकात तर संपूर्ण हृदयाचे चित्र दिलेलंअसतं. पण शिक्षक फळ्यावर ही आकृती काढताना एक एक भाग समजावत जातात आणि त्या हृदयाला पूर्ण करत जातात तेव्हा विद्यार्थ्यांना हृदयाचं कार्य टप्प्याटप्प्याने स्पष्ट होत उमजतं. गणितात ‘संख्यारेषा’ ही महत्त्वाची संकल्पना शिकवताना ती ‘अमर्याद’ असते हे सांगण्यासाठी जेव्हा शिक्षक पूर्ण फळ्याचा वापर करून ती रेषा त्याही पलीकडे नेतात तेव्हा ती पुस्तकातली छोटीशी संख्यारेषा किती अमर्याद आहे याची वास्तविक कल्पना विद्यार्थ्यांना येते. पहिले महायुद्ध आणि दुसरे महायुद्ध यांच्यातील फरक पुस्तकात तर परिच्छेदांमध्ये मांडलेला असतो. फळ्याचे दोन भाग करून शिक्षक एक एक मुद्दा स्पष्ट करत जातात तेव्हा विद्यार्थी तो नेमका फरक नीट समजू शकतात.संस्कृत शब्द किंवा श्लोक लिहिताना शिक्षक जेव्हा काळजीपूर्वक हलन्त,विसर्ग, अनुस्वार योग्य पद्धतीने लिहितात त्या वेळी विद्यार्थ्यांना शुद्धलेखनाचं महत्त्व स्पष्ट होत असतं.

अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानेंद्रियांना गुंतवणं महत्त्वाचं असतं तसंच वेगवेगळे ज्ञानेंद्रिय आलटून पालटून कार्यरत होणेही आवश्यक असतं नाहीतर विद्यार्थी कंटाळतात. शिक्षक समजावतात तेव्हा त्यांचे ‘कान’कार्यरत होतात. वर्गात वाचन चालतं तेव्हा त्यांचे ‘डोळे’कामाला लागतात. लेखन कार्य करताना त्यांचे ‘हात’कार्य मग्न होतात आणि फलकलेखनमुळे विद्यार्थी पुस्तकातून डोके वर काढून, लेखनातून हात जरा बाजूला घेऊन फळ्यावर लिहिलेले वाचण्यात गुंग होतात.

फलक लेखन करताना बरेचदा शिक्षक महत्त्वाच्या शब्दां खाली रेष ओढून त्याचे महत्त्व अधोरेखित करतात. लिहिलेल्या शब्दांमधील अतिशय महत्त्वाच्या शब्दांभोवती वर्तुळ करतात. दोन शब्दांमधील संबंध त्यांच्यामध्ये बाण काढून स्पष्ट करतात. या लहान लहान बाबी देखील विद्यार्थ्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. शिक्षकांनी शिकवलेल्या भागाची उजळणी करताना वर्गात शिक्षकांनी जसे फलकलेखन केलेले होते ते बाण ,अधोरेखित शब्द , केलेले वर्तुळ जसेच्या तसे विद्यार्थ्यांना आठवते आणि त्यातून त्यांची उजळणी उत्तम होण्यास मदत होते.

एखादी किचकट, अवघड व लांबलचक संकल्पना नीट समजून घेण्यासाठी त्या संकल्पनेच्या क्रमवार पायऱ्या नोंदी स्वरूपात शिक्षक फळ्यावर लिहितात त्यामुळे त्या संकल्पना छोट्या छोट्या भागांमध्ये विभागल्यामुळे विद्यार्थ्यांना नीट समजतात. या पद्धतीचा उपयोग स्व अध्ययन करताना विद्यार्थी स्वतः देखील करतात.

एखाद्या व्यक्तीची शाळा, त्याचा वर्ग, त्याचे शाळेतील शिक्षक ही त्याच्या आयुष्यातील एक हळवी जागा असते. तो पुढे कितीही शिकला, मोठा झाला तरी शाळेत केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी तो कधीही विसरू शकत नाही हा जगजाहीर अनुभव आहे. यावरून असं लक्षात येतं की…

तो काळा फळा म्हणजे विद्यार्थ्यांचे अबोध मन. त्यावरचं पांढरं शुभ्र लेखन म्हणजे त्या अबोध मनावर उमटलेली ज्ञानाची पावलंच!

म्हणूनच तर मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी त्या फळ्यावर आपली अक्षरमुद्रा वा चित्रकला अंकित करण्यासाठी आसुसलेले दिसतात नाही का?

सौ.अपर्णा शेंबेकर

१४.०७.२५

(विशेष चित्र सौजन्य अमित बोरखडे )

About the Author

अपर्णा शेंबेकर

Author

View All Posts
Tags: लेखनप्रयोग२०२५ सुरपाखरू

Continue Reading

Previous: स्त्रीचं मानसिक आरोग्य – भाग १
Next: देवपूजा
चर्चेत सामिल व्हा

संबंधित लेख

kachchaalimbu
  • अवर्गिकृत

कच्चा लिंबू

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
bhagwan-nile-cover
  • अवर्गिकृत

सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच

यामिनी दळवी ऑगस्ट 4, 2025
देवपूजा
  • अवर्गिकृत

देवपूजा

चंचल काळे ऑगस्ट 4, 2025

ताजे लेख

  • कच्चा लिंबू
  • सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच
  • देवपूजा
  • उमटती ज्ञानाची पाऊले….
  • स्त्रीचं मानसिक आरोग्य – भाग १

जुने लेख

  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • अवर्गिकृत

हे वाचून बघा

kachchaalimbu
  • अवर्गिकृत

कच्चा लिंबू

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
bhagwan-nile-cover
  • अवर्गिकृत

सांगायलाच हवंय असं नाही…पण वाचायला मात्र हवाच

यामिनी दळवी ऑगस्ट 4, 2025
देवपूजा
  • अवर्गिकृत

देवपूजा

चंचल काळे ऑगस्ट 4, 2025
Art by Amit Borkhade
  • अवर्गिकृत

उमटती ज्ञानाची पाऊले….

अपर्णा शेंबेकर ऑगस्ट 4, 2025
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.