मागील भागावरून पुढे …..
वैभव सर, हमारे सर आये हैं क्या? असे मला कोटक ची एक विक्री प्रतिनिधी विचारत होती.
हां वह आये हैं, और मीटिंग भी हो गयी हैं। असे मी तिला सांगितले तेव्हा आता पुढे कसे जावे हे तिला कळत नव्हते. कारण व्यवस्थापकांच्या केबिनचे दार उघडे होते. तरी एकदम हुशारीने जावे हे तिने ठरविले. तेवढ्यात रागावण्याचा आवाज आला.
इतनी देर क्यों हुयी तुम्हे। एक तो तुमसे टारगेट पूरा नहीं होता और ऑफिस में देर से आती हो। नशा कर के सोती हो क्या ?
हे असे शब्द ऐकल्यावर आम्हाला सुद्धा वाईट वाटायचे. पण Sales मधे असे राहतेच असे बरेच जण म्हणतात. अशा भाषेत बोलणारे ते व्यवस्थापक गृहस्थ तसे मनाने अत्यंत चांगले होते. मुलगा आणि मुलगी असा स्टाफ मध्ये ते कधीच भेदभाव करायचे नाही. ज्या मुलीला आपण रागावतो आहोत ती रडली तरी चालेल पण ज्याप्रमाणे ते मुलांना रागवत त्याच शैलीत मुलींनाही रागवत. एवढे असूनही त्यांच्याविषयी एक विशेष सन्मान त्या सर्व विक्री प्रतिनिधींना होता.
मी स्वतः जेव्हा त्यांना म्हटले, सर जरा आरामात ओरडत जा. कारण आमचे बाकी जुने क्लायंट पण इथे बाकी केबिन्स ला बसतात. त्यांची जरी आतापर्यंत तक्रार आलेली नसली तरी मी आताच आपल्याला सांगून ठेवलेले बरे. असे म्हणून त्यांनी ते जरा मनावर घेतले.
पण sales ते शेवटी.
आता जसा एक एक महिना पुढे जात होता कोटक च्या नवीन इमारतीचे बांधकाम पूर्ण होत होते आणि त्याच्या स्टाफ मधील एक एक जण नौकरी सुद्धा सोडायला लागले होते. काही लोक हे क्रेडिट कार्ड विकणे सोपे नाही म्हणून नौकरी सोडून लोन, विमा इत्यादी क्षेत्रात नशीब आजमावायला जात होते तर कुणी नौकरी सोडून व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत होते. हे सर्व रोजच्या रोज आम्ही बघत होतो.
प्रत्येकाचा एक वेगळा संघर्ष होता. कुणी अत्यंत श्रीमंत असूनही या क्षेत्रात होता तर कुणावर घरची मोठी जबाबदारी होती म्हणून खूप मेहनत घेऊन १२ ते १४ तास कार्य करत होता.
हे सर्व होत असतांना त्या दोन विक्री व्यवस्थापकांपैकी एकाशी माझे एका वेगळ्या विषयावर बोलणे झाले.
मी त्यांना म्हटले, सर आज तर पार्टी असणार शनिवार असल्याने.
अरे नाही वैभव, पार्टी वगैरे नाही.. मी ड्रिंक्स वगैरे किंवा अन्य काहीच घेत नाही. तुम्ही ऐकून असाल वैभव की या क्षेत्रात मी असूनहि असा का? तर मला स्वतःला आवडत नाही. समजा असे केले तर आई घरात येऊ देणार नाही. घरी लहान बाळ, बायको सगळेच आहेत रे.
मी जे या तणावाच्या क्षेत्राविषयी ऐकून होतो त्या विपरीत असा व्यक्ती कुणी असू शकतो हे बघून नवल नाही वाटले कारण तसे गृहीत धरूनही ठेवले नव्हते. काही अपवाद असतात हे सुद्धा तेवढेच लक्षात होते.