
पटांगणावर खेळणाऱ्या मुलांचा खेळ रंगात आला होता.
रविवारी सकाळी कॉफीचा कप घेऊन निवांतपणे खिडकीत बसून पटांगणावर चाललेले खेळ,गप्पा, भांडा- भांडी बघण्याचा छंदच लागला आहे. कोणीतरी बॅटिंग करायला आलं, एक दोन बॉलमध्येच आऊट झालं. तेवढ्यात गटातले कोणीतरी ओरडले…
.’अरे…करू द्या त्याला बॅटिंग अजून…. तो कच्चा लिंबू आहे!’
‘कच्चा लिंबू’ हे शब्द ऐकले आणि पटांगणात गुंतलेले डोळे आणि कान मेंदूकडे संदेश पोहोचवेनासे झाले.
आता ‘कच्चा लिंबू’ या शब्दामागच्या संदर्भांचा, आठवणींचा, अनुभवांचा चित्रपट डोळ्यांसमोर झळकू लागला.
लहानपणी माझ्या ज्या मैत्रिणी होत्या त्यापैकी बऱ्याच मैत्रिणी वयाने माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठ्या. त्यामुळे एखाद्या खेळाची त्यांची समज आणि कौशल्य माझ्यापेक्षा जास्त असायचे. त्यामुळे त्या मला ‘कच्चा लिंबू’ म्हणून सहभागी करायच्या.
(केवढे हे औदार्य!)

आपण कच्चा लिंबू असलो की मनावर खेळाचा ताण येत नाही. कच्चा लिंबू आऊट झाला तरी त्याला पुन्हा एकदा खेळण्याची संधी दिली जायची. थोडं काही चुकलं तर न चिडता नजरेआड केलं जायचं. मला कच्चा लिंबू म्हणून खेळात सहभागी होणं फार सोयीचं वाटायचं. दोन-तीन महिने कच्चा लिंबू म्हणून खेळलो की त्या खेळातले वेगवेगळे डावपेच, सावधानता छान आत्मसात व्हायची.
मग त्याच म्हणायच्या ‘ ए..आता मात्र तू पक्की गडती हं.. आजपासून ‘कच्चा लिंबू’ नाही बरं का..!’
म्हणजे याचा अर्थ असा की खेळाचे सगळे नियम मलाही काटेकोरपणे लागू होतील. तेव्हा काय मस्त वाटायचं. एखाद्या मोठ्या हुद्द्यावर आपली बढती झाली आहे असा तो आनंद असायचा!
मग त्या खेळात आपल्या गटाला जिंकून देण्यासाठी पूर्ण कौशल्य पणाला लागायचं. प्रतिस्पर्ध्याला आऊट केलं की आपल्यासाठीही टाळ्या वाजायच्या. आउट झालो की बाकीच्या गटाला खेळताना आपली उणीव प्रकर्षाने जाणवायची. या सगळ्यामुळे त्या पक्क्या लिंबू झालेल्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढत असे.
आता मागे वळून पुन्हा त्या ‘कच्चा लिंबू’ या संकल्पनेकडे बघितलं तर वाटतं…लहान मुलं खेळातून किती सुंदर संकल्पना तयार करतात. एकमेकांचं मानसशास्त्र समजून त्याप्रमाणे खेळ खेळतात. आधी नवीन असणारा तो खेळगडी ‘कच्चा लिंबू’ म्हणून इतरांचा खेळ बघत बघत शिकत जातो आणि मग तो त्या खेळामध्ये प्रवीण होतो. पण या दरम्यान या कच्चा लिंबू संकल्पनेमुळे त्याला अजिबातच ताण-तणाव येत नाही. खेळाच्या मानसशास्त्राचं हे एक उत्तम नियोजन आहे.
पण गंमत अशी की आपल्या रोजच्या आयुष्यात आपण मोठे झालो की ही कच्चा लिंबू संकल्पना आपण वापरतो का?
मोठ्यांच्या जगाचे नियम फार वेगळे असतात. जो कोणी भाग घेणारा असेल तो पक्काच असला पाहिजे, सगळ्या नियमांचा त्याने काटेकोर अभ्यास करून प्राविण्य मिळवलेच पाहिजे अशी आपली अट असते. तुम्ही कच्चे असाल तर समाज तुम्हाला सतत हारल्याची जाणीव करून द्यायला मागेपुढे बघत नाही. मोठ्यांच्या जगात कच्चेपणाला थारा नाही.
नाहीतर दुसरी बाजू अशी असते की एखादा व्यक्ती कच्चा लिंबू असला आणि त्याला तसे इतरांनी सांभाळले तर तो त्या कच्चा लिंबू या सवयीला इतका सरावतो की त्याला ‘पक्का लिंबू’ कधी व्हायचेच नसते. आपल्या कार्याची जबाबदारी घेणे आणि येणाऱ्या परिणामांना सामोरे जाणे हे कौशल्य त्याला प्राप्त करायचेच नसते. मनात येईल तसे वागावे, जेवढे जमेल तेवढे काम करावे आणि काही चुकले तर मी तर कच्चाच लिंबू आहे म्हणून अंग झटकून टाकावे अशी त्याला सवयच होऊन जाते.
तो प्रत्येकच वेळी इतरांकडून त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष व्हावे अशी अपेक्षा करतो. हे दुसरे टोक देखील इतरांना त्रासदायक ठरते.
स्त्रीकडून देखील समाज भरपूर अपेक्षा करतो. ती सुंदर असावी, तिची राहणी, कपडे सगळं व्यवस्थितच असायला हवं. तिला उत्तम स्वयंपाक, घर राखणे, सगळ्यांची काळजी सगळंच कौशल्यपूर्वक येणं अपेक्षित असतं. त्यापैकी एखाद्या बाबतीत जर ती डावी असेल तर तिच्या इतर उत्तम उजव्या बाजू दुर्लक्षित करून ज्या बाबतीत ती थोडी कच्चा लिंबू आहे तीच बाब पुन्हा पुन्हा अधोरेखित करून.. तुला हे नीट जमत नाही… याची सतत जाणीव करून दिली जाते.
काही स्त्रिया मात्र धाडसाने हे अपेक्षांचे ओझे बिनधास्त बाजूला करताना दिसतात. त्यांना हवं तसं जगण्याचा आनंद घेतात.
त्याचप्रमाणे पुरुषांना देखील ‘कच्चा लिंबू’ असण्याचे स्वातंत्र्य नाही. त्याने उत्तम पैसा कमवायला पाहिजे, सगळ्या बाबतीत पुढाकार घेऊन घर चालवलं पाहिजे, मुला बाळांच्या , कुटुंबाच्या सगळ्या अपेक्षा त्यांनी पूर्ण केल्याच पाहिजेत असा जर तो असेल तर ठीक आहे नाहीतर त्याला देखील समाजाच्या टोमण्यांचा किंवा टिकेचा चांगलाच सामना करावा लागतो.
प्रत्येकच पुरुष ‘मर्द को दर्द नही होता…’ असा ‘पत्थर दिल’ कसा असेल? पण हळव्या मनाच्या पुरुषांना समाज तितकेसे स्वीकारताना दिसत नाही. ‘उंची’ हा देखील पुरुषांसाठी फार मोठा मापदंड मानल्या गेला आहे. उंची कमी असणारे पुरुष समाजाला तेवढे पसंत नसतात. त्यामुळे ज्यांची उंची कमी आहे त्यांना त्याबद्दल कुठेतरी खोलवर ती खंत असल्याचे लक्षात येते.
जेव्हा अपेक्षांचा खूप ताण वाढतो तेव्हा बरेच पुरुष व्यसनांचा आधार घेताना दिसतात. कारण त्यांना आपल्या मनातील दुःख, चीड स्त्रियांसारखी पटकन कोणाजवळ बोलता येत नाही. काही अपवादात्मक उदाहरणांमध्येच पुरुष आपल्या मनातील दुःख दुसऱ्यांना सांगताना आढळतात. नाहीतर त्यांच्या बोलण्याचा विषय हा क्रिकेट, राजकारण, ऑफिस मधील राजकारण, महागाई यापैकी असतो.
आता हळूहळू चित्र बदलते आहे असे जाणवते.
समाज माध्यमे यामध्ये चांगली भरीव भूमिका निभावताना दिसतात. पण कधी कधी समाज माध्यमांवर देखील प्रचंड स्पर्धेसाठी होड लागलेली दिसते.
प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या आयुष्यातील वेगवेगळ्या अनुभवातून, प्रसंगातून, शिक्षणातून, वाचनातून आणि संस्कारातून घडत असतो. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीमध्ये काही अतिशय उत्तम गुण आणि काही थोडे सुधारण्यास वाव असलेले गुण देखील असतात. इथे आपण सुधारणे आवश्यक आहे हे त्यालाही उमजत असतं. त्याचाही प्रयत्न चालूच असतो. पण म्हणून घरच्यांनी, समाजाने त्याला सतत पुन्हा पुन्हा तो त्याबाबतीत कच्चा लिंबू आहे अशी जाणीव करून देण्याची आवश्यकता नाही. जगात आदर्श लोक नसतातच. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठे ना कुठे काहीतरी कमतरता असतेच. हे जर खिलाडू वृत्तीने स्वीकारल्या गेले तर अनेक लोकांचा डळमळणारा आत्मविश्वास, त्यांच्या मनात येणारा न्यूनगंड, इतरांपेक्षा आपण तिथे कमी आहोत याची त्यांना सलणारी जाणीव कमी होईल.
‘पाणी मिळेल का आम्हाला?’
पटांगणावर खेळणारी मुलं धापा टाकत मला म्हणाली. त्यामुळे विचारांचे चौखूर उधळलेले घोडे एकदम लगाम खेचल्यागत थांबले.
मी गंमत म्हणून म्हणाले,”ए.. तुमच्यात मी येऊ का खेळायला? पण मला पहिली बॅटिंग हवी!”
मुलं आनंदाने हो म्हणाली .एकमेकांना म्हणाली.
‘ए आपल्या खेळात या कच्चा लिंबू हा ! ठीक आहे ना.. चालेल सगळ्यांना ?.. सगळ्यांनीच हो या अर्थाने माना डोलावल्या.
मला मनातल्या मनात फार हसू येत होते.
मला त्यांच्या खेळात ‘कच्चा लिंबू’ म्हणून सामील होण्यात किती आनंद होत होता हे त्यांना कसे कळणार?
अपर्णा शेंबेकर
१५.०६.२०२५
#सुरपाखरू #लेखनप्रयोग२०२५