सुरपाखरू उडाले रे …
किती समर्पक नांव शोधले आहे या प्रकल्पासाठी. सूर पाखरू … #सुरपाखरांचा थवा. फुलपाखराची जन्म कथा आणि लेखकाची जन्मकथा यात बरीच साम्यस्थळे सापडतात. फुलपाखरू उडत उडत एखाद्या फुलझाडावर विसावते आणि सहजपणे एका पानावर आपले अंडे सोडते. तसेच कुठून तरी उडत उडत एक कल्पना लेखकाच्या मन-पानावर विसावते. हे ‘कुठूनतरी’ म्हणजे …
प्रदूषणीय धुरात असते, प्रदर्शनीय पुरात असते
कोकिळेच्या स्वरात असते, समोर दिसता वरा-त असते.
शेतामधल्या घरात असते, सुपात असते,
कर्णात असते, वर्णात असते, भात्यात असते,
तुपात असते, वरणात असते, भातात असते,
याच्यात असते, त्याच्यात असते, सांगा मजला कुठे ती नसते?….
सुरपाखरू!!!…
हे असं काही सुचलं की नव-लेखक ते लपवू बघतो. पुस्तकातील पानाच्या आड. आता त्या कल्पनेचे एक सुरवंट होते …. मनाची मशागत सुरु होते .
गद्य करू की पद्य करू? हास्य करू की हृद्य करू?
हीचे नाटक होईल का? केली कविता, पटेल का?
वाचलं तेवढं पुरेल का? नवं वाचायला मिळेल का?
सुरपाखरू …!
प्राचीन जे ते गुगलून काढू!
अर्वाचीन ते उकलून काढू!
शब्दांना मग बुकलून काढू.
जेन-झी हे वाचेल का?
बेबी बूमर डोकवेल का?
चॅट जीपीटी सुचवेल का?
सुचवेल,सुचवेल, सुचवेल
सुरपाखरू!!!
आणि मग …बिचकत बिचकत ‘अनिकेत’ टोपण नावाचे आवरण घेऊन लेखक उडवून देतो आपले लिखाण एखाद्या लेखन स्पर्धेच्या आकाशात …
*
अनेक वर्षांपूर्वी कां घेतले होते मी टोपण नांव? फियर ऑफ फेल्युअर… अपयशाची भीती… ते पचवायची नसलेली हिम्मत. नवे, पहिल्यांदाच काही करताना ही भीती हमखास असतेच. नवा नवा कवी गवसला की मित्र-वर्तुळात त्याचे रॅगिंग होते. कुणी वडीलधारी माणसं भेटतात, कौतुक करतात. काही काव्य शास्त्राच्या अनुषंगाने सुधारणा सुचवतात. . रला र, फला फ करत यमक जुळवणी होते त्याचे कौतुक होते . तरीही स्पर्धेत भाग घ्यायचं म्हटलं की हिम्मत होत नसे. असो. ह्या आटपाट नगरच्या गोष्टी. पण त्या आटपाट नगरातल्या मित्रांनी, घरच्यांनी अनेक प्रतिक्रिया दिलेल्या असतात काही बोचऱ्या, काही दुखऱ्या. तशाच गोंजारणाऱ्या , सावरणाऱ्या . . जगण्यासाठी, लढण्यासाठी, तगण्यासाठी हिंमत देणाऱ्या.
*
फिअर – भीती… पहिल्यांदा कधी अनुभवतो आपण? आठवते?
माणूस भीती घेऊन जन्माला येत नाही. लहान मूल निर्भय असतं. त्याच्या मनात कुतूहल ठासून भरलेलं ते भूभू ला घाबरत नाही, त्याच्याशी खेळायला जातं. भूभूला घाबरणारं कुणी मोठं असेल तर ते त्या लहान्याला भूभूला भ्यायला शिकवतं. उद्देश असतो त्या लहान्याचे संरक्षण. ही अशी संरक्षणासाठी भिंत बरेच वेळा बऱ्याच कारणांनी उभारली जाऊ शकते. काही काही वेळा ह्या संरक्षण भिंतीमुळे एखादं माणूस घाबरट बनून जगतं. आपल्यातील, अंगभूत असणाऱ्या अनेक क्षमता गमावून किंवा गोठवून बसतं. जरा या भयावर चिंतन करू या.
एकदा भय ह्या शब्दाचे पर्यायी शब्द डोळ्या खालून घालू या.
भय, भीती, धाक, दबदबा, आशंका, दहशत, वचक, धास्ती, दरारा, धोका, जरब, नवीन अनुभव घेताना शंका कुशंका मनात असतात.चुकण्याची शक्यता असते. त्याची लाज वाटू शकते किंवा नव्याने प्रयत्न करण्याची चिकाटी देऊ शकते. माझ्या मनातील भावना सांगायला मला नेमका शब्द पटकन आठवत नाही. मला कुणी मागून भो केलं कि मी घाबरतो का दचकतो? अधिकार असणाऱ्यांचा धाक वाटतो की भीती वाटते? या दोन भावना मनात आल्या की मी कसा वागतो? धाक मला सांभाळून वागायला सांगते तर भीती मला तिथून पळायला लावते. धास्ती मला निर्बल करते, कारण ती माझ्या आत घर करून वसते. दहशत मला असहाय करते. वचक मला शिस्त देते. धोका मला सुरक्षित ठेवते.
इतक्या वर्षात एक माझ्या लक्षात आलय, भयावर उतारा धाडसाचाच लागतो. तो आपल्याला सुरवंटाकडून शिकायला मिळतो.
सुरवंटाला फुलपाखरू होताना भीती वाटत असेल? असावी, कदाचित आवरणात गुदमरून मरणाची…. मग ते हळू हळू हालचाल करतं, हळूहळू पुढे सरकतं, अलगद आवरण बाजूला सारत, मग त्याला जाणीव होत असावी नव्या बदलाची, लाभलेल्या पंखांची, ते धाडस करतं, त्या पंखांना हलवण्याची, पुन्हा एकदा धाडस, अलगद … अलगद … अलगद … त्याला स्पर्शत असेल सुगंधी वारा… ते उत्सुक होत असेल जाणून घ्यायला कुठून येतोय हा सुगंध, ….. त्याच्या बारीक डोळ्यांना दिसत असेल एखादे कोमल फूल लाल… मग पिवळे,… मग निळे….
फुलपाखरू उडाले रे…. आयुष्य हे असे जगायला हवे. प्रत्येक नव्या अनुभवासाठी उत्सुक … अनुभवाचा उत्सव करत.
*
सुरपाखरू, छान किती लिहिते, सुरपाखरू।।
या विषयावर, त्या विषयावर
लिहीत किती बसते ,सुरपाखरू.।।
मनामनावर शब्द मनोहर,
पेरीत बघ असते, सुरपाखरू ।।
करते टक टक, उमटती शब्द मग
कुठेच ना चुकते, सुरपाखरू ।।
मी लिहू जाता, खातो गोता
यास बरे सुचते , सुरपाखरू ।।
(कवी ग.ह. पाटील यांची क्षमा मागून)
लेखक श्रीधर जहागिरदार
दिनांक १ जानेवारी २०२६
,
#सुरपाखरू #३०दिवसात३० #प्रयोग२०२६