घरचा डॉक्टर
माझी ८३-८४ ला एम. बी. बी.एस. इंटर्नशिप पूर्ण झाली आणि त्यानंतर चि. मोहनचा डॉ. मोहन झाला. त्याआधी कधी कधी गरज पडली की , आम्ही आमचे फैमिली डॉक्टर , डॉ. डी .बी. देशपांडे ह्यांच्या कडे जात असु. त्यानंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी वैद्यकीय सेवा दिली पण दैवीकृपेने कधी मला स्वतःसाठी कोणा डॉक्टरकडे किंवा कोणत्या रुग्णालयात जावे लागले, असे झाले नाही. छोट्या छोट्या कारणांसाठी माझ्या वैद्यक क्षेत्रातील माझे सहकारी मला सल्ला आणि मदत देत असतात. आयुष्यात पहिल्यांदा मला कोविड काळात डॉक्टरची गरज पडली, तेव्हा मी माझे शेजारी डॉ. राजीव बनकर ह्यांची मदत घेतली आणि तेव्हापासुन तेच माझे एकमेव डॉक्टर झाले आहेत . त्यांची सुद्धा मी खुप मदत घेत नाही , कारण मला माझ्या घरीच सर्वसमावेशक वैद्यकीय सेवा सुविधा मिळत असतात. ही गोष्ट फक्त माझीच आहे असे नाही तर, जगातील सर्व डॉक्टरांसाठी असा एक डॉक्टर घरीच असतो, आणि ती म्हणजे त्याची पत्नी.
कु. अल्पना माझ्या जीवनात १९९१ सौ.राधा बनुन आली आणि तेव्हापासुन तिने माझ्या आयुष्यात “ व्यक्तिगत वैद्यक अधिकारी “ हे स्थान पटकाविले आणि ते स्थान आजपर्यंत सांभाळले आहे . मी माझ्या दवाखान्यात काय काय करीत असतो, किती वेगवेगळ्या प्रकारे रुग्ण सेवा करीत असतो ,त्यात मला किती यश अपयश मिळत असते, ह्याचा ह्या माझ्या डॉक्टरला काहीही लेणे देणे नसते. माझ्या वैद्यकिय व्यवसायातील कितीतरी गोष्टी तिला मी कधीही न सांगता कश्या माहिती आहेत , हे मला माहीत नाही . त्यामुळे मी माझ्या ह्या घरच्या डॉक्टर पासुन जरा जपुनच राहतो. दवाखान्यात मला बरेच वेळा रुग्णाला औषधी किंवा इतर उपचार योजना समजावून सांगावी लागते,पण आमचे घरचे हे डॉक्टर मला समज देतात आणि मी समजुन जातो. दवाखान्यात रुग्ण मला शंका, कुशंका,उपप्रश्न विचारून कितीही त्रस्त करीत असले तरी , आमच्या ह्या घरच्या डॉक्टर कडे तशी काही सोय नसते आणि मी स्वतःला एक आदर्श रुग्ण समजुनच वागत असतो .
माझ्या घरच्या डॉक्टर कडुन मला सर्वसमावेशक स्वास्थ्य सेवा (Comprehensive Health Care) न मागता अखंडपणे मिळत असतात . सकाळी प्रथिनयुक्त नाश्ता, दुपारी हाई फायबर जेवण आणि रात्रीचे हलके फुलके जेवण कधीही कंटाळा येणार नाही, अश्या योजनाबद्ध पद्धतीने वर्षानुवर्षे चालत असते. माझ्या जेवणाआधी घ्यायचा औषधीला , ती “ स्टार्टर” म्हणते,आणि मी ते स्टार्टर न विसरता घेतो की नाही , ह्याकडे माझ्या डॉक्टरचे लक्ष असते . बाहेर कोठे जेवण करायचे असेल तर , तेथे मी काय , किती आणि कसे खातो आहे , ह्याकडे आमचे डॉक्टर लक्ष ठेऊन असतात. माझ्या रोजच्या व्यायामाचा नेम चुकता कामा नये म्हणून , आमचे हे डॉक्टर स्वतः नियमित व्यायाम करतात . जेवणाच्या वेळी मोबाईलचा वापर प्रतिबंधित केलेला असल्यामुळे, अन्न हे पूर्णब्रह्म,जाणिजे यज्ञकर्म , हे खरोखरीच घडत असते. सायकल चालविताना हेलमेट घेतले की नाही, ह्यापासून तर , माझी कार सिग्नलवर झेब्रा क्रॉसिंगच्या आधी थांबली की नाही, ह्याकडे सुद्धा आमचे डॉक्टर लक्ष देत असतात . कॉलेजला जाताना पेन ड्राईव्ह , पाण्याची बाटली, शेतात जातांना टिफिन, गॉगल,टोपी अश्या असंख्य बारीक सारीक गोष्टी आमच्या ह्या डॉक्टर कडुन सुटत नसतात. आमचे ह्या घरच्या डॉक्टरची अजुन एक विशेषता आहे, ती म्हणजे त्यांच्या उपचाराने आजार नुसता बरा होतो असे नाही तर तो आजार समुळ दुरुस्त होत असतो,असा माझा अनुभव आहे .प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे एक स्त्री असते, असे म्हणतात, पण प्रत्येक यशस्वी वैद्यकीय पुरुषामागे अशी एक स्त्री नक्की असते , हे मी स्वतःच्या अनुभवातून सांगु शकतो.