दादा
आमच्या परिवारात आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी,त्यात आम्हा सर्वांना पितृव्रत असलेला आमचा मोठा भाऊ म्हणजे वामनदादा. आमच्या कुटुंबात त्याला “दादा” ही त्याने मिळवलेली पदवी होती,अगदी माझी आई सुद्धा त्याला दादा म्हणत असे आणि तिच्यासहीत आम्हा सर्वांना त्याची आदरयुक्त भीती वाटत असे.अगदी लहानपणी त्याला स्वतः उभे रहायला कुबड्या लागल्या होत्या , असे आम्ही ऐकले होते,पण त्याने त्या तेव्हाच झिडकारून स्वतः ला तर सशक्तपणे उभे केलेच, पण आम्हा सर्व बहीणभावंडाना नागपूरला आणून आपापल्या पायावर सशक्तपणे उभे केले , ही वस्तुस्थिती आहे. तो अवघा पंधरा वर्षाचा असतांना , आलेल्या दुष्काळाचा आमच्या वडिलांनी त्याचा इतका धसका घेतला होता की , त्यांनी त्यानंतर शेती करणेच बंद केले . आमचे घरी उत्पन्नाचा दुसरा कोणताही स्रोत नसल्यामुळे आमच्या वडिलांनी त्यानंतर आम्हा बहीणभावांना पुढील शिक्षणासाठी आपली असमर्थता दर्शविली, पण आमच्या दादाने कधीही हार मानली नाही आणि त्याने त्याही परिस्थितीत आमचे कुटुंब सांभाळून ठेवले . तेव्हा दुष्काळामुळे कंगाल झालेल्या आमच्या कुटुंबाला आमच्या दादाने क्रमशः नागपुरला आणले. कोणताही ठोस आर्थिक वा सामाजिक पाठिंबा नसताना त्याने पहिले नागपूरला स्वतःचे पाय रोवले आणि सोबतच एकएक करुन आम्हा सर्वांना नागपूरला आणले. त्याने हे अशक्यप्राय काम कसे कसे केले , ह्याचा मी साक्षीदार आहे , पण इतर कोणालाही ते स्वप्नवत वाटावे, अशीच ती परिस्तिथी होती.
माझी मोठी बहीण पद्माताईला नर्सिंगला पाठवून त्याने तिला आपल्या पायावर उभे केलेले मी पाहिले आहे. पुढे तिने आमच्या गावात ३०० च्या वर बाळंतपणे आणि माता बालसंगोपन केले,हा एक विक्रम म्हणावा लागेल. माझी दुसरी बहीण लीलाआक्काला ,त्याने तो स्वतः एम कॉम होत असतांना , बी एड शिकवुन तिला शिक्षिकेची नोकरी मिळवून दिलेले मी अनुभवले आहे. पुढे ती उमरेडला प्राचार्या म्हणुन निवृत्त झाली . माझा मधला भाऊ गिरीशभाऊ, शाळा सोडुन गावात काम करायचा , पण त्यालाही नागपूरला आणून , त्याला होमिओपॅथी डॉक्टर केलेले मी पाहिले आहे. मी तर त्याचा सर्वात आवडता, त्याने मला नगर परिषदेच्या शाळेतुन चवथी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करताच नागपूरला हडस विद्यालयात शिकायला आणले . त्याला स्वतःला डॉक्टर होता आले नाही , म्हणुन त्याने मला डॉक्टरचे शिक्षण देऊन आपली हौस पूर्ण केली, असे तो सतत सांगत असे. शिक्षणाची त्याला इतकी ओढ आणि आवड होती की , त्याने आम्हा सर्वांना तर शिकविलेच पण त्याने स्वतः सुद्धा ,त्याचे लग्नानंतर, एम फिल केले आणि पुढे मोखारे महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम सुद्धा केले होते.
आम्हा बहिणभावांची ही जबाबदारी घेत असतांना त्याने स्वतः इतकी वेगवेगळी कामे केलेली आहेत, की त्यांची आज मला कल्पना सुद्धा करवत नाही . धरमपेठ महाविद्यालयामध्ये स्वतः शिक्षण घेत असतांना , त्याने तेथे अगदी कार्यालयीन मदतनीस पासुन लिपिकापर्यंत सर्व कामे केली होती, पुढे त्याच महाविद्यालयात आमच्या दादाने शिक्षक म्हणून नोकरी घेतली होती. महाविद्यालयातील अगदी तुटक्या पगारात आम्हा सर्वांची पोट भरण्यासाठी त्याने खुप जोड व्यवसाय सुद्धा केलेत. एलआयसी एजेंट, दत्ता कोचिंग क्लासेस, हाथ रिक्षा भाड्याने देणे,अशी एक ना अनेक कामे तो करत असे. हे सर्व करतांना आमच्या शिक्षणात कोठेही बाधा येऊ नये , हेच त्याचे एकमात्र ध्येय होते.
आम्हा बहीणभावांची ही जबाबदारी पेलतांना त्याने स्वतः च्या जीवनात किती काटकसर केली, हे मी व्यक्तिगतरित्या अनुभवले आहे. कॉटनची वा टेरिकॉटची साधी शर्ट पँट आणि स्वस्त खादीचे अंतर्वस्त्र आणि छाती वरून खालपर्यंत येणारी बहुउद्देशीय लुंगी हेच त्याचे आवडते कपडे असायचे. एव्हाना पुढील आयुष्यात त्याने खुप समृद्धी निर्माण केली, पण त्याने त्याचा हा काटकसर आणि अत्यंत हिशोबी राहण्याचा स्वभाव आमरण सोडला नाही. ही काटकसर एकदा तर आमच्या जीवावर बेतली होती. नागपूर ते शेंदुर्जना घाट प्रवासात त्याकाळी थेट बस सेवा नसायची. नागपूर ते जलालखेडा असा प्रवास करून वर्धा नदी ओलांडून वरुडकडे जाणाऱ्या बसने पुढे जावे लागत असे. वर्धा नदी ओलांडण्यासाठी नावाडी पैसे घेत असे, तेव्हा दादाने मात्र मला खांद्यावर घेऊन पोहून जायचे ठरवले. मी तेव्हा १२-१३ वर्षाचा असेल,आणि मला जुजबीच पोहायला येत होते. पण आम्हाला नदीच्या खोलीचा आणि प्रवाहाचा अंदाज नसल्यामुळे आम्ही दोघेही कसेबसे पैलतीरी लागलो, ह्याची आठवण आली की , मला आजही अंगावर शहारे येतात.असो. अगदी सुरुवातीला दादाचे उत्पन्न नाममात्र होते,पण त्याही काळात त्याने पाईपाईचा लिहून ठेवलेला हिशोब , मी एक आठवण म्हणून जपुन ठेवलेला आहे. कितीही धन असले तरी त्याचा चवथा भाग खर्च न करता शिल्लक ठेवावा, हे व्रत त्याने आम्हा सर्वांना दिले होते,त्यामुळे आमच्या कुटुंबाला त्यानंतर कधीही आर्थिक अडचण कधी आली नाही , हे नक्की.
आमच्या गावावरून वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी नागपूर शहरात आलेल्या आमच्या दादाचा जनसंग्रह किती अवाढव्य आहे, ह्याची कोणालाच कल्पना येणार नाही. आम्ही सख्खे बहिणभाऊ सोडुन त्याला किती भाऊ- बहिणी, किती काका – काकू,किती दादा – वहिनी आणि किती मानसपुत्र असावेत , त्याची गणती नाही. बरेच माझे रुग्ण ह्या आठवड्यात दवाखान्यात येऊन त्यांच्या आठवणी सांगत आहेत, तेव्हा मलाच त्याचे आश्चर्य वाटत आहे.कोणत्याही घरात बहिणी, वहिनी, मावशी किंवा काकू त्याला कश्या भेटत होत्या, हे मला न उलगडलेले कोडे आहे. नवीन कार घेतली म्हणुन कॉलेजच्या विद्यार्थ्याना त्याने पेढे देऊन कारमधुन चक्कर मारून आणले, असे माझ्या मित्राच्या पत्नीने जेव्हा मला सांगितले,तेव्हापासुन त्याचे कल्पनाचित्र रंगवावे म्हटले तर, ते मला आजही रंगविता आलेले नाही .
जे जे स्वतः ला करता आले नाही, ते ते दुसऱ्या कोणाकडून करवुन घेण्याची कला आमच्या दादाकडे होती. त्यांना संघ विस्तारक होण्याची खुप प्रबळ इच्छा होती, पण एकंदर कौटुंबिक परिस्थिती पाहता त्याला ते जमले नव्हते. पण, मी माझे एम बी बी एस चे शिक्षण पूर्ण करून जेव्हा प्रचारक म्हणुन सेवा व्रत घेतले , तेव्हा त्यांने मला त्यासाठी प्रोत्साहन दिले होते. इतकेच नाही तर सातपुडा जंगलात प्रवास करता येईल , असे वाहन सुद्धा घेऊन दिले होते. मी त्यांचा लहान भाऊ असलो तरीही , मला तो स्वतःचा सर्वात मोठा मुलगा , असा मान देत असे , त्याचे असे अनेक अनुभव माझ्या मनात खोलवर रुतलेले आहेत . आठ दशके प्रदीर्घ आयुष्य जगलेल्या ह्या माझ्या दादांच्या आयुष्यातील १९४५ ते १९८५ ह्या पहिल्या चार दशकातील अश्या अनेक आठवणी आज एका पाठोपाठ एक गर्दी करीत आहेत. त्याच्या आयुष्यातील उर्वरीत चार दशकांसाठी मी वेगळे क्रमशः लिहिणार आहे, पण ह्या सोमवारी त्यांचे अचानक निघून जाण्याने मात्र , मला माझे हे पालकत्व नेहमीसाठी हरवल्यासारखे वाटते आहे , हे नक्की.