
शिरीष कणेकर हे माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक. ‘माझी फिल्लम बाजी’, ‘गाये चला जा’, ‘यादों की बारात’ ही त्यांची पुस्तकें हिंदी चित्रपट संगीत आणि एकुणच चित्रपटविषयी उत्तम पुस्तकांपैकी आहेत. क्रिकेट आणि चित्रपटांबद्दलचे त्यांचे एकपात्री प्रयोग त्यांच्या काळाच्या बरेच पुढे होते.
नंतर कणेकरांनी मराठी साप्ताहिकात स्तंभ लेखनास सुरुवात केली आणि बरीच वर्षे सातत्याने लिहिले. या लेखांचे संग्रह लवकरच आश्चर्यकारक संख्येने पुस्तकांमध्ये प्रकाशित झाले… किमान ३५-४० तरी पुस्तकें! (जर मी चुकत नसेन तर)
मी मोठ्या उत्सुकतेने हे लेखसंग्रह वाचण्यास सुरुवात केली, पण लवकरच निराश झालो. टवाळकी , चापलुसकी , चापटपोळी , टिवल्याबावल्या अशी चित्रविचित्र नांवें असलेल्या या पुस्तकांत खुसखुशित कणेकरी लेखनशैली होती, परंतु ती पूर्वीप्रमाणे खिळवून ठेवत नव्हती. त्यांनी त्यांच्या विषयांची व्याप्ती बरीच वाढवली होती, परंतु त्याबदल्यात त्यांनी त्यांच्या पुस्तकांचा मूळ गाभा असलेली खोली आणि ‘वर्गीकृत’ माहिती गमावल्यासारखे वाटत होते .
या गुणवत्तेतील घसरणीबद्दल मला प्रश्न पडायचा. दैनिक –किंवा अगदी साप्ताहिक — स्तंभ लिहिणेही लेखनाच्या गुणवत्तेसाठी हानिकारक आहे का? हा लेखनप्रकार यशस्वीपणे हाताळलेले लेखक आहेत का ?
या प्रश्नांची उत्तरे मला मिळाली ती सुरपाखरू उपक्रमात सामील झाल्यानंतर काही आठवड्यात!
पुढील लेखात आपण स्तंभलेखनातील संभाव्य धोके पाहू आणि शेवटच्या लेखात ते कसे टाळायचे यावर चर्चा करू.
गौतम सोमण
नागपूर
बुधवार, ९ जुलै २०२५