
या लेखात आपण दैनंदिन स्तंभलेखनातील काही संभाव्य धोके पाहू.
मुद्दा १
एक नवीन लेखक म्हणून आपण असा विचार करतो की स्तंभलेखनासाठीच्या विषयांवर कोणतेही बंधन ठेवू नये, यामुळे माझे लेखन अधिक वैविध्यपूर्ण व मनोरंजक होईल. हे अगदी खरे आहे कि असे विशिष्ट फोकसशिवायचे लेख लिहिणे सोपे होते. पण जेव्हा तुम्ही हे सर्व लेख पुस्तकात संकलित केलेले एकत्र वाचता तेव्हा तुम्हाला आढळेल की खूप जास्त वैविध्य हे एकूणच विचारांच्या विस्कळीतपणासाठी कारणीभूत ठरले आहे.
मुद्दा २
हा मुद्दा १शी संबंधित आहे. भौतिकशास्त्राचा एक मूलभूत नियम आहे की जेव्हा तुम्ही एखाद्या वस्तूचा परीघ वाढवता तेव्हा त्याची घनता कमी होते. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही सुचेल त्या विषयावर लिहायला सुरुवात करता तेव्हा तुम्हाला आढळेल की प्रत्येक विषयातील तुमची विचारांची खोली लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
मुद्दा ३
स्तंभलेखनाची व्याख्याच अशी आहे कि तुम्हाला प्रत्येक लेख एका विशिष्ट मुदतीत आणि नेमक्या शब्दमर्यादेतच लिहून द्यावा लागतो. याचा सृजनात्मक लेखनावर नकारात्मक परिणाम होतो. बहुतेक वेळा विचारांना, शब्दांना सक्तीने आटोपशीर ठेवावे लागते. उलटपक्षी, काही हलके-फुलके विचार, जे एक किंवा दोन परिच्छेदांमध्ये व्यक्त करता आले असते, ते अनावश्यक शब्दांनी भरावे — खरं तर “फुगवावे ” — लागतात. दुर्दैवाने, सध्याचे बहुतांश स्तंभ अशा “निष्कारण शब्दबंबाळ” श्रेणीत येतात.
मुद्दा ४
शेवटचे आणि कदाचित सर्वात महत्त्वाचे म्हणजे – मला वाटते की जो कोणी निव्वळ स्तंभलेखन करतो तो खरा, परिपूर्ण लेखकच नव्हे. सोशल मीडियाच्या विपुलतेमुळे आणि लेखन अगदी विनासायास सामायिक करण्याच्या सोयीमुळे आपण प्रत्येकजण आपल्या अर्धवट, अर्ध्या-कच्च्या गद्याला लेख म्हणू लागले आहोत . एकेकाळी केवळ नामवंत, सृजनशील व्यक्तींनी केले जाणारे, उच्च कलेचा दर्जा असलेले लेखन आता सर्वसामान्य क्षेत्रात बदलले आहे.
म्हणजे…
कोणीही स्तंभलेखन करूच नये का? हा संदेश मला नक्कीच द्यायचा नाही!
पुढील लेखात आपण, वर उल्लेखलेल्या अडचणी कशा टाळायच्या आणि एक चांगला, उच्च दर्जाचा दैनिक कॉलम कसा लिहायचा ते पाहू.
गौतम सोमण
नागपूर
१६ जुलै २०२५
उर्वरित भाग