आक्का
आम्ही तीन भाऊ आणि दोन बहिणी,अशी पाच भावंडे. माझी मोठी बहीण आम्हा सर्व भावंडात सर्वात मोठी , इतकी मोठी की , तिची मोठी मुलगी माझेपेक्षाही मोठी, म्हणजे मामा लहान आणि भाची सहा महिने मोठी . पण माझी दुसरी बहीण माझेपेक्षा १० वर्षानेच मोठी होती आणि तीच माझी आक्का. मी १० वर्षाचा असताना आईवडिलांना गावाला सोडुन माझ्या शालेय शिक्षणासाठी जेव्हा मी नागपूरला आलो , तेव्हा हीच माझी एकमेव सोबत होती . गावावरून मी नागपूरला आलो , तेव्हा मला माझे पहिले मित्र म्हणून तिच्याच मैत्रिणी होत्या . मी गावावरुन नागपूरला आलो होतो , त्यामुळे माझी भाषाही पक्की गावरान होती ,त्यामुळे येथील शहरी मित्रांमध्ये माझी थोडी भाषेची पंचायत ह्यायची. मग माझी आक्काच , मला माझ्या अभ्यासासोबत, शहरात कसे मराठी बोलायचे असते, हेही शिकवायची. त्या दृष्टीने , ती माझी पहिली गुरु होती. पुढे मी पंधरा वर्षाचा असतानाच , माझी आई देवाघरी गेली आणि माझी अक्का तेव्हापासुनच माझी पूर्ण पालक झाली . तिने माझे हे पालकत्व अगदी आमरण पाळले, आणि माझ्या आयुष्यातील आईची पोकळी जमेल तितकी भरून काढली , ह्याबाबत आजही माझ्या मनात काही शंका नाही.
मी नागपूरला आलो तेव्हा माझी आक्का सुद्धा महाविद्यालयीन शिक्षण घेत होती . पुढे तीचे बी एड साठी कॉलेज असतांना , ती सकाळी उठून सर्वांसाठी स्वयंपाक करून , आमचे डब्बे तयार करून नंतरच , जात असे. पुढे तिला आधी पाचगाव आणि नंतर उमरेडला शिक्षिकेची नोकरी मिळाली , तरीही दर आठवड्याच्या शेवटी माझी आक्का आमच्यासाठी घरी असायची . माझे शाळेचे शिक्षण पूर्ण झाल्यावर , मी धरमपेठ महाविद्यालयात प्रवेश घेतला, तेव्हा तिचे लग्न झाले आणि मग तर, मी हक्काचे आपले घर, म्हणून तिच्याच घरी जात असे.
मी पुढे जेव्हा नागपूरला स्थायिक झालो , तेव्हा माझी आक्का उमरेडच्या शाळेत मुख्याध्यापिका म्हणून काम करत असे. पण राखी आणि भाऊबीज हे हक्काचे आणि कोणतीही सुट्टी आली की जमेल तसे , आमचे कौटुंबिक स्नेहमिलन (गेट टू गेदर ) ठरलेले असायचे. माझ्या मुलांसाठी तर आत्याचे घर हे आपल्याच घराचा विस्तारित भाग ( एक्सटेंशन ) असायचा. मला आळूच्या पानाची वडी , पापड, कुरडया, मेतकूट, जुने लोणची आणि इतर जे जे पदार्थ आवडतात, ते सर्व मला तेथे खायला मिळत आणि शिवाय सोबत सुद्धा मिळत असे. किंबहुना तिने माझ्या सोबत माझ्या मुलांना सुद्धा तितकाच लळा लावला होता आणि त्यांच्याही आवडीनिवडी ती आठवणीने पूर्ण करीत असे . आम्हा सर्वांसाठी ते आमचे हक्काचे माहेर होते.
मला एकदा माझ्या दवाखान्याची जागा विकत घेण्यासाठी थोडी आर्थिक अडचण आली होती , आणि तिला जेव्हा हे कळले , तेव्हा तिने स्वतः हून बँकेत असलेले तिची मुदत ठेव ( फिक्स डिपॉझिट ) मोडून माझी ती अडचण सहज सोडवली होती, तिच्या पालकत्वाची जणू ती जबाबदारीच होती . मी तिच्यापेक्षा जरी दहा वर्षांनी लहान होतो तरी , ती मला दादा म्हणायची , आणि मी तिला आक्का. तसे पाहिले तर आमचे हे बहीण भावाचे नाते दुसऱ्याच स्तरावरचे होते ,आणि आम्हा दोघांसाठी , ते तसे मर्यादित कधीही नव्हते. माझ्या आयुष्यात तीने माझी मैत्रीण, गुरु,पालक,आई अश्या वेगवेगळ्या रूपात आपले स्थान मिळविले होते आणि माझ्या भावविश्वात त्या सर्व रूपात ती मुक्त संचार करीत असे .
तीचे आम्हा सर्वांच्या आयुष्यातून निघून जाणे , तसे अकस्मातच झाले. कोविड च्या त्या काळात तेव्हा मी सुद्धा कोविडग्रस्त होतो आणि ती अगदी दोन दिवसाच्या आजारात अकस्मात निघुन गेली , आणि माझे हक्काचे माहेर संपुष्टात आले . आज राखीपौर्णिमाच्या दिवशी आमच्या अनेक आठवणी आजही डोळ्यासमोर एका पाठोपाठ येत आहेत , सर्वांना माझ्या ह्या अक्काबहिणीसारखी एक आक्का ,जरुर असावी ,असे मनापासुन वाटते .