राखीपौर्णिमा श्रावणातली
बहीण भावाचे नाते जपण्याची
हिरवीसृष्टी फुलांनी नटली
सण साजरा होण्यासाठी!!
रेशीम बंधन हे नात्याचे
भाऊ बहिणीच्या प्रेमाचे
दूर दूर जर का भाऊराया
कुरिअरपोस्ट कामा आले!!
रंगीत रांगोळी पाटाभोंवती
सजलेल्या तबकात राखी
दीप पेटवे ओवाळण्या भगिनी
औक्षवंत भ्रात्यास होण्यासाठी!!
मलमलकुर्ता भावाचा रंगीत
डोईवर शोभे सोनेरी टोपी
नाकी नथ, नेसली शालू
अलंकाराने बहीण नटलेली !!
खुश आज झाले दोन्ही
हास्य फुले चेहऱ्यावरती
ओवाळता प्रिय भाऊराया
तबकात मिळे ओवाळणी!!
नाही ज्यांना आहें भाऊ
चंद्रमा नभात त्याच्यासाठी
ओवाळून त्यास संध्याकाळी
तृप्त जाहली ती भगिनी!!
आज आभागी ते आहें सारे
ज्यांचे मनगटी नाही राखी
नसता भाऊ बहीण कुणी रे
खन्त जीवा ती जाळत राही!!
बहीण भावाच्या प्रेमळ नात्याचा हा सण. राखीपौर्णिमेवर आज ही कविता लिहिली आहें. जेव्हा वय वाढते नकळत बहीण भाऊ दोघे साठी पार करतात. आपापल्या संसारात त्यांना आजी आजोबांचे प्रमोशन मिळते. प्रत्यक्ष भेटून साजरा होणारा राखीचा सण आता साजरा करायला मोबाईल मदतीला येवू लागतो. कुणी नशीबवान असले तर अगदी सहस्त्रचंद्रदर्शन झाले तरी बहीण भावांची साथ असते… पण मग कुणी एक आधी जातो आणि हा सणही उदास होतो.. त्यावेळी येतात त्या आठवणी… आणि त्या सुखद आठवणीचा स्मृतिगंध मनात दाटतो, आणि नकळत बांध फुटतो आणि अश्रूच्या धारा आवरता येत नाही दाबलेला हुंदका बाहेर येतोच.
असेच काही आज सकाळी माझ्या घरी घडले नव्वदी पूर्ण केलेली माझी कणखर आई गेल्या वर्षात तिचे दोन लहानभाऊ पाठोपाठ गेल्याने त्याच्या आठवणीने व्यथित झाली होती तिच्या मनातल्या भावना लिहिण्याचा माझा प्रयत्न.
“स्थापत्य संरचनाकार मोठा
धन्वंतरी भाऊ होता धाकटा
त्याची होती ती मोठी ताई
राखी भाऊबीज होई साजरी..
लहान ते होते दोघे भाऊ
आदर्श त्यांना त्यांची ताई
जेव्हा निघाली ती सासरी
नयनी भावांच्या तेव्हा पाणी
दिवस सोनेरी सरून गेले
जरा ती सर्वा नकळत आली
भेटणे प्रत्यक्ष कमी जाहले
फोनवर मात्र नित्य बोलणे..
राखी साजरी फोनवरी रे
व्हाट्सअप त्याचा साथी
दुरूनच राखी करे साजरी
ओवाळे भावांना नेत्रज्योती..
जाणे निश्चित असते आपुले
भाऊ दोन्ही पाठोपाठ गेले
माहेर होते ते न तिचे राहिले
सण नात्याचे विराण झाले..
कुणास बांधू आज राखी
दोघे भाऊ आज ते नाही
स्मृती सुखद त्या आठवता
दबलेला हुंदका येई ओठी ..
पौर्णिमेचा चंद्र आज
समुद्रावर उतरला आहे,
लाटांच्या कुशीत चांदणे
हळुवार विसावले आहे…
नव्वदीच्या उंबरठ्यावर
निश्चल ती उभी एकटी,
डोळ्यांत आठवणींचा दर्या ,
ओठांवर शांतता दाटली…
हातात आज राखी नाही,
ओवाळायला भाऊ नाही,
स्मृती सागर मनी उसळला,
समोर किनारा दिसत नाही…
लाट येते, पायाला स्पर्शून
पुन्हा परत जाते दूरदूर ती ,
तशीच प्रत्येक आठवण
हृदयाला करते चूर चूर ती …
दोन भाऊ दूर गेले तरी
नाते कधी दूर जात नाही,
काळाने राखीचा धागा तुटला
प्रेमळ स्मृतीगाठ कधीच
सुटत ती नाही…”
… हेमंत नाईक