*चिऊताई, चिऊताई दार उघड!- मंगेश पाडगांवकर*
दार उघड , दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!
दार असं लावून,
जगावरती कावून,
किती वेळ डोळे मिटून आत बसशील?
आपलं मन आपणच खात बसशील?
वारा आत यायलाच हवा,
मोकळा श्वास घ्यायलाच हवा!
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!
फुलं जशी असतात, तसे काटे असतात;
सरळ मार्ग असतो, तसे फाटे असतात!
गाणाऱ्या मैना असतात, पांढरे शुभ्र बगळे असतात
कधी कधी कर्कश काळे कावळेच सगळे असतात!
कावळ्याचे डावपेच पक्के असतील,
त्याचे तुझ्या घरट्याला धक्के बसतील!
तरी सुध्दा या जगात वावरावंच लागतं
आपलं मन आपल्याला सावरावंच लागतं!
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!
सगळंच कसं होणार आपल्या मनासारखं?
आपलं सुध्दा आपल्याला होत असतं पारखं!
मोर धुन्द नाचतो म्हणून आपण का सुन्न व्हायचं?
कोकीळ सुंदर गातो म्हणून आपण का खिन्न व्हायचं?
तुलना करीत बसायचं नसतं गं,
प्रत्येकाचं वेगळेपण असतं गं!
प्रत्येकाच्या आत एक फुलणारं फूल असतं ;
प्रत्येकाच्या आत एक खेळणारं मूल असतं!
फुलणाऱ्या या फुलासाठी,
खेळणाऱ्या या मुलासाठी
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई, चिऊताई दार उघड!
निराशेच्या पोकळीमधे काहीसुध्दा घडत नाही!
आपलं दार बंद म्हणून कुणाचंच अडत नाही!
आपणच आपला मग द्वेष करु लागतो!
आपल्याच अंधाराने आपलं मन भरू लागतो!
पहाटेच्या रंगात तुझं घरटं न्हालं,
तुला शोधीत फुलपाखरु नाचत आलं!
चिऊताई ,चिऊताई, तुला काहीच कळलं नाही!
तुझं घर बंद होतं, डोळे असुन अंध होतं!
बंद घरात बसून कसं चालेल?
जगावरती रुसून कसं चालेल?
दार उघड, दार ऊघड,
चिऊताई,चिऊताई दार उघड!
मंगेश पाडगांवकर (रसग्रहण)
जगावर चिडलेल्या प्रत्येक स्त्रीला किंवा मुलामुलींना उद्देशून ही कविता आहे. ही कविता रुपकात्मक आहे.चिऊताई म्हणजे आपणच आहोत .कधी नशिबावर रुसून मनाचे सर्व दरवाजे बंद करून बसलेलो.म्हणजे सारासार विचारशक्ती हरवून बसलेलो .अशा व्यक्तींना उद्दैशून ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर समजावत आहे.त्याबरोबरच प्रत्येक निराश व्यक्तींना ते या कवितेतून संदेश देत आहेत.ते म्हणतात,
असं रागावून बसू नका थोडा विचार करा .डोळे उघडे ठेवून विचार करा . म्हणजेच जीवनात सर्वच काही आपल्या मनासारखं होत नाही.थोडी तडजोड तर करावीच लागते.मनाला मुरडही घालावीच लागते.डोळे उघडे ठेवून म्हणजे बाकी जगाकडे ही पहा कित्येक अशा व्यक्ती आहेत ज्यांच्या छोट्या छोट्या इच्छादेखील पूर्ण होत नाही.त्यापेक्षा तर तुमच्याकडे खूप काही आहे.उगाच मन विषण्ण करून बसू नका.मोकळं व्हा विचार करा.दीर्घ श्वास घेऊन नवीन विचारांना आत येण्यासाठी दार उघडा.नकळतच ही कविता वाचताना मुक्ताईं ची ताटी उघडा ज्ञानेश्वरा ही रचना आठवते.
जीवनात आनंद आणि दु:ख दोन्ही असतात.जीवन हे सरळ कधीच नसतं त्यात अनेक अकल्पित अशी वळणं असतात
जीवन हे सुंदर संगीत असतं म्हणूनच तर पाडगांवकर म्हणतात या जगण्यावर शतदा प्रेम करावे .जीवन पवित्र निर्मळ असतं पण कधीकधी कर्कश्श पण वाटतं.ज्याप्रमाणे संगीतात एखादा सूर बेसूर झाला की ते आवडत नाही.त्याचप्रमाणे काही घटना अशा घडतात की विरस होतो.अनेक दुष्ट लोक असतात जे फक्त जीवनात त्रास देण्यासाठीच येतात.त्यामुळे मन अस्वस्थ होतो.पण यालाच तर जीवन म्हणतात ना.संकटं नाही ते जीवन कसलं.मग अगदीच अळणी होणार.त्यामुळे त्यातूनच मनाला सावरून पुढे जायचं असतं.
सगळंच काही मनासारखं होणार नाही हे समजून घेतलच पाहिजे .कधीकधी आपलेच लोक आपल्याला पारखे होतात तर कधी आपलं मन देखील आपल्याला पारखं होतं असतं.
दूस-याच्या आनंदाने दु:की न होता त्यातूनच आपला आनंद शोधता आलाच पाहिजे..अनेक उदाहरणं देऊन कवी आपल्याला समजावत रहातो .
कधीच दूस-याच्या जीवनाशी,नशीबाशी आपली तुलना करायची नसते.त्याने दु:खच वाट्याला येणार हे निश्चित.प्रत्येकाचं नशीब वेगळं,हातावरच्या रेषांही वेगळ्या असतातच.प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते.पण त्याबरोबरच प्रत्येकाचं आपलं एक मन असतं हृदय असतं ते सदैव फुलत रहावं यासाठी आपणच प्रयत्न करायला हवे.प्रत्येकामध्ये एक मुल असतं
जे खेळकर वृत्तीचं असतं.कधी हट्टी देखील असतं पण ते निरागस असतं.त्यासाठी आपल्या अंतर्मनात डोकावता मात्र आलं पाहिजे.पण हेच जर तुम्ही रूसून बसला कुणाचेच काही ऐकायच नाही असं ठरवलं तर मात्र कठीण आहे.त्यामुळे ही मनाची दारं , विचारशक्ती नेहमी जागृत ठेव. त्यासाठी तरी दार उघड .
निराश होऊ नको .त्याने काहीच साधणार नाही .एक पोकळी मात्र निर्माण होईल .जीवनात शिवाय दु:खाच्या काहीच नाही या विचाराने तुम्ही भरकटून झालं.बाकी कुणाचं काहीच नुकसान होणार नाही तुम्ही काय विचार करतात याच्याशी कुणालाच काही घेणं देणं नाही.जो तो आपल्यातच मस्त आहे.मग तुमची चिडचिड वाढेल आणि स्वतःच्या नशीबाचा तुम्ही तिरस्कार कराल.आणि निराशेच्या गर्तेत पार बुडून जालं.त्यातून तुम्हाला कुणीच काढू शकत नाही.
पुढे ते चिऊताईला म्हणतात अशा अंधाराला तू घाबरू नकोस बघ यानंतर तुझं घरटं पहाटेच्या उजेडात उजळून निघेल म्हणजेच दु:खानंतर सुख हा जीवनाचा नियमच आहे .पण ही वेळ जर तू समजूतदारपणे निभावलीस तर नंतर सुख आहेच सर्व तुझ्या मनासारखं घडेल.यावर विश्वास ठेव हे विश्वासाचं फुलपाखरू तुझ्या हृदयात विहरू दे.तुला काहीच कसं कळत नाही .अगं इतके दिवस तुझ्या मनाचे दार तू बंद करून ठेवलं होतं .डोळस दृष्टी तुझ्याकडे नव्हती .पण आता बघ तुझ्या हृदयांगणात आशेचे फुलपाखरू भिरभिरत आहे .तुझ्यातील आनंद रूपी फुलांवर ते झेपावत आहे.तुला प्रफुल्लित करण्याचा जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पहाण्याचा संदेश ते घेऊन आलं आहे .त्याच्यासाठी मनाचे दरवाजे सदैव उघडे ठेव त्यांना बंद करून चालणार नाही.जगाकडे पाठ फिरवून चालणार नाही.नव्याने हसत खेळत मस्त जगायला शीक.जीवनाचा आनंद घे!
अतिशय सकारात्मक दृष्टिकोन असणारी ही कविता विविध उपमा देऊन कवीवर्यांनी सर्व मनुष्य जातीसाठी लिहीली आहे.जीवनाचे कटु सत्य स्वीकारून जीवनाचे रसपान करता करता त्यांचे मधूर गीत कसं होईल हे पहायला हवं !