
गेल्या दोन लेखांमध्ये आपण स्तंभलेखनातील काही संभाव्य धोके पहिले. आजच्या लेखात आपण ते कसे टाळायचे ते पाहू.
१. विशिष्ट विषयाच्या अभावामुळे दिशाहीन लेखमाला
कोणत्याही निश्चित विषयाशिवाय, स्वैर विचारांवर विसंबून लेखमालिका लिहिणे सोपे असले तरी, जर तुम्हाला तुमच्या स्तंभलेखनाला दीर्घकालीन मूल्य हवे असेल तर विषयाधारित मालिका लिहिली पाहिजे. उदाहरणार्थ, दैनिक तरुण भारतमधील डॉ. रमा गोळवलकर यांचे भारतीय शिल्पांवरील लेख केवळ वाचनीयच नसतात तर त्यांना वस्तुनिष्ठ मूल्यदेखील असते.
२. आवाका वाढत गेला की खोली कमी होते
जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर आधारित लिहायला सुरुवात करता तेव्हा त्यावर संशोधन करणे सोपे होते. तसेच, त्या विषयात रुची असणारे लोक लेखमालिका आवर्जून वाचतात, त्यावर उत्साहाने टिप्पणी करतात. या सगळ्यातून आपल्याला पुढील लेखांसाठी नवीन विचार, नवीन धागे मिळत जातात.
३. कोणत्याही विषयाचे समान शब्दांच्या लेखांत विभाजन करणे कठीण असले तरी, लेखमालिका त्याच विषयावर आधारित असल्याने, शब्दमर्यादेचे उल्लंघन होत असल्यास काही भाग पुढील लेखांत सहजगत्या सरकवू शकता . तसेच क्रॉस-रेफरन्सिंग खूप सोपे जाते .
४. तुम्ही एकाच विषयावर लिहित असल्याने, तुम्ही सहजपणे लेखांचे संकलन पुस्तकात करू शकता आणि ते विषयाच्या अनुषंगाने प्रकाशित करू शकता.
५. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे, जेव्हा तुम्ही एखाद्या विशिष्ट विषयावर लेखमालिका लिहिता तेव्हा तुम्ही आपोआप त्यावर एक अधिकारी व्यक्ती बनण्याकडे वाटचाल सुरु करता. तुमचे नाव त्या विषयाशी जोडले जाते.
गौतम सोमण
नागपूर
२९ जुलै २०२५
उर्वरित भाग