Skip to content

सुरपाखरू साहित्य

मराठी साहित्याची दिंडी

Primary Menu
  • मुखपृष्ठ
  • लेख मालिका
  • लेखक समुदाय
  • गोपनीयता धोरण
  • ललित

#30 दिवसात 30# प्रयोग जुलै2026

ऐश्वर्या डगांवकर जुलै 7, 2026 1 minute read
0
gumohor-water
ललित लेख 
पहिला पाऊस 
   पहिला पाऊस हा विषय सर्वांच्याच मनात बालपणीच्या आठवणी फुलविणारा आहे.
     गोल गोल राणी कित्ता कित्ता पानी , ये रे पावसा तुला देतो पैसा ,सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल का शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल का सारख्या बालसुलभ भावना मनात दाटून येतात.पहिल्या पावसात भिजण्याचा जो आनंद आहे तो अवर्णनीय असतो.बालपणीच नव्हे तर अगदी या उतारवयात देखील पावसात भिजण्याचा मोह सुटत नाही!
     वैशाखाच्या वणव्यानंतर आभाळात काळ्या  ढगांची लगबग सुरू होते.मोर पिसारा फुलवून नाचू लागतात. एखाद्या आतुरलेल्या प्रियकराप्रमाणे चातक पक्षी आतुरतेने झाडावर बसून मृगाची प्रतिक्षा करू लागतो.हळूहळू पावसाची आस सर्वच प्राणीमात्रांच्या जीवाला लागली असतांनाच हळूच कुठून थंड हवेची झुळूक मनाला सुखावून जाते.ओला मृद्गंध पावसाचा निरोप घेऊन येतो.सूर्यदेव मात्र ढगाआड लपून हे सारे पहात असतात.पण लगेच बरसतील ते मेघ कसले .ते तर कालीदासातील मेघा प्रमाणेच इकडे तिकडे हुलकावणी देत फिरत असतात.तहानलेलं रान चातकासारखीच वाट पहात उसासे सोडत असतं.सारं चराचर पावसासाठी आसुसले
असते.
        अचानक नीलवर्णी आकाश जेव्हा श्यामल वर्णात बदलायला लागतं..आकाशात श्याम मेघांची दाटी व्हायला लागते ..वारा स्वैर वहायला लागतो ..तेव्हा सारं चराचर ,झाडंवेली.. धरा,प्राणीपक्षी..प्रतिक्षा संपली म्हणून  हुश्श करतात.कारण ग्रीष्माची काहिली सोसून  सगळेच  थकलेले असतात न!
      मग ढगांच्या नगा-यात..बिजलीच्या चमचमाटात पर्जन्य राजाचे स्वागत होते. 
पहिल्या पावसाची अशी चातकासारखी वाट पहाणारे अवघे  चराचर सुखावते. टपटप मोत्यासारखा पावसाच्या सरींनी धरणी आतून  उमलून येते.तिचा आनंद  काय वर्णावा! कस्तुरी मृगाला जसा कस्तुरी सुगंधाचा पत्ताच नसतो तसेच धरेचेही होते. तिच्यात दडलेला मृदगंध, पहिल्या  पावसाने उधळून लावलेला असतो.ज्याच्या नावातच सुगंध आहे..गंधाळलेपण,चिंब भिजण्याचा आभास आहे.मातीच्या ओलेपणातच एक दरवळ आहे !जेव्हा मृगाची पहिली सर तिच्या कुशीत शिरते.. तेव्हा पसरतो जो गंध..तो मृद्गंध,सर्व  अत्तरांची त्याने सुट्टी   केलेली असते. वारा त्याला साथ देत,वातावरणात तो मृद्गंध भरून टाकतो.  पक्षीगण आनंदाने विहरू लागतात. भिजू  लागतात. वृक्षवल्ली आनंदाने डोलू लागतात. मुलं माणसं अंगणात ..रस्त्यावर येऊन  नाचू लागतात.पहिला पाऊस  तर माणसाला बालपणात ओढून नेतो.  
         पाऊस  आला की मी आणि माझी भावंडे मनसोक्त भिजायचो. मग मैत्रिणींचा नंबर! सगळे जण पहिल्या पावसाचा भरपूर  आनंद लुटायचो.   ये रे  ये रे  पावसा तुला देतो पैसा असे म्हणत पावसाला  बोलवायचो. आता विचार केला तर असे वाटते ,आपण चक्क पावसाला लालूच  दाखवत होतो की!  भ्रष्टाचाराचे मूळ इथून  सुरू होत होते तर! पण त्या लाच देण्यात एक प्रकारची निरागसता होती हं!  पसायदाना प्रमाणे सर्वांसाठी ते पावसाचे मागणे होते. निरागस..निस्वार्थी..! पावसात  भिजण्याची मजा काही औरच असते न! अहाहा! आनंदाला नुसते उधाण आलेले असते.अशावेळी आईच्या हांका ऐकूच येत नाही. मग ओरडा खावा लागायचा.मग,
घेऊ या अंगावरी 
पावसाच्या सरी
फ्रॉक भिजे गं भरजरी
आई रागावे वरवरी
डोई पुसे वरचेवरी 
मायेने आपल्या पदरी
पळून जातसे आम्ही 
तुरी देऊन तिच्या हातावरी!
    सगळ्यांच्या होड्या बनवून झाल्या की मग पाण्यात  सोडण्यासाठी धावपळ. खूप मजा यायची. होडीबरोबर आमचाही प्रवास सुरू होई. कुठपर्यंत  जाते पहाण्यात मजा येई. आपल्या होडीबरोबर इतरांच्या होड्या कुठपर्यंत  जातात. कुणाच्या अडतात. माझी पुढे तुझी मागे.आपली होडी न अडखळता पुढे गेली की खूप  आनंद व्हायचा.  कुणाची बुडली तर ,अरेरे! आपसूकच  तोंडातून बाहेर पडायचे. मग पुन्हा होडी बनविण्याची धडपड सुरू! होडी सोडताना..ती लांबवर जातांना पहाण्यात खूप  आनंद मिळे. मुंग्या कशा एकमेकींना भेटून  पुढे जातात तशाच आमच्या होड्या मधूनच  एकमेकींना भेटून  पुढे पुढे जायच्या.  ते दिवस..ते  अंगणात कडेकडेने वहाणारे पागोळ्यातील पाणी… त्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहाणा-या कागदी होड्या! ती मजाच काही और होती !
       
        कागदी होडीची आठवण आली की मनात विचार  येतो. आपलंही जीवन असंच क्षणभंगुर  आहे नाही.! आपलं जीवनही त्या कागदी होडीप्रमाणेच आहे.  चालंलं तितकं चाललं नाहीतर होडीप्रमाणे बुडालं !  कागदी होडी प्रवाहाबरोबर वहाते. अडथळा आला तर कधी अडतेही . पण पाण्याचा जोर वाढला तर पुन्हा  अडथळ्यांवर मात करून..वळसा घालून पुढे पुढे जातेच की !  आपलेही तसेच आहे. जीवन नौका प्रवाहात कुठे अडली तर प्रयत्न  नी गुरूकृपेच्या  जोरदार  आधारावर  संकटांवर मात करीत पुढे जाता येते.किती छान शिकविते ना ही होडी.  कुठेही अडून बसू  नका जीवन प्रवाही ठेवा. धैर्याने..संयमाने  अडथळ्यांवर  मात करा.  प्रवाहाबरोबर पुढे पुढे जाण्याचा आनंद  लुटा.  सकारात्मक  भाव ..विचार ठेवा. वाह!  गोष्ट छोटीशी..कागदी होडी छोटीशी..पण सकारात्मक मोठा विचार पेरून गेली.
त्या मृद्गंधाची सर कुठल्याही कुपीत भरलेल्या अत्तराला असते का?पण त्यासाठी फक्त पहिल्या पावसाची वाट पहायची .मातीचा हा गंधसोहळा फक्त तेव्हाच अनुभवता येतो.तो गंध आपल्या श्वासा श्वासात भरून घ्यायचा असतो.
  
    पहिल्या पावसाची अशी चातकासारखी वाट पहाणारे अवघे  चराचर सुखावते. टपटप मोत्यासारखा पावसाच्या सरींनी धरणी आतून  उमलून येते.तिचा आनंद  काय वर्णावा! कस्तुरी मृगाला जसा कस्तुरी सुगंधाचा पत्ताच नसतो तसेच धरेचेही होते. तिच्यात दडलेला मृदगंध, पहिल्या  पावसाने उधळून लावलेला असतो. सर्व  अत्तरांची त्याने सुट्टी   केलेली असते. वारा त्याला साथ देत,वातावरणात तो मृद्गंध   भारून टाकतो.  हा गंध सृष्टीने आपल्यासाठी निर्मित केलेला त्यांची सर दुसऱ्या कुठल्याच गंधाला नाही.हे गंधलेणं  पहिला पाऊस आपल्याबरोबर घेऊन येतो.झाडामाडांवरून ,  पानापानातून फुलाफुलांंत हा गंध परिमळत असतो. डोंगराडोंगरात,खडका कातळास भिडतो.घरावर छपरावर आपला मायेचा फिरवतो. फांदी फांदीत गुणगुणतो आणि वा-यासवे हळूवार झुलत अलगद आपल्या मनात शिरतो. पहिला पाऊस सा-या सृष्टीलाच अंतर्बाह्य स्पर्शून जात असतो!अविरत अखंड झरत ओथंबत कवितेत उतरत जातो !

लेखक

  • ऐश्वर्या डगांवकर

    पूर्वाश्रमी-वर्षाराणी दाणे
    शिक्षण-- शालेय आणि महाविद्यालयीन -धुळे
    बी. ए. ऑनर्स इंग्रजी विषयात
    पूना युनिव्हर्सिटी महाराष्ट्र.
    व्यवसाय --लेखिका /कवयित्री --मराठी हिंदी गृहिणी,कथाकथन,रसग्रहण
    भ्रमणध्वनी -९३२९७३६६७५

Post navigation

Previous: मन????
Next: नागपूरचा इतिहास – राणी दुर्गावत
चर्चेत सामिल व्हा - लेखाबद्दल चर्चा वेगळ्या समुदाय पानावर करण्यात येते, तिथे जाण्यासाठी इथे क्लिक करा

संबंधित लेख

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0

ताजे लेख

  • धेनुकासूर वध आणि कालियामर्दन
  • समारोह
  • पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात
  • जुनी पाने
  • सजग पालकत्व : काळाची गरज

मोफत बातमीपत्र

आमच्या बातमीपत्राचे सभासद व्हा आणि प्रकाशित होणाऱ्या लेखांची माहिती लगेच इमेल मधे मिळवा.

जुने लेख

  • जुलै 2026
  • जून 2026
  • मे 2026
  • एप्रिल 2026
  • मार्च 2026
  • फेब्रुवारी 2026
  • जानेवारी 2026
  • डिसेंबर 2025
  • ऑगस्ट 2025
  • जुलै 2025

विभाग

  • काव्यास्वाद
  • ललित

हे वाचून बघा

DSC_0602.JPG
  • ललित

धेनुकासूर वध आणि कालियामर्दन

राम किन्हीकर जुलै 31, 2026 0
itchy-scalp-sir-me-khujli-ke-lakshan-karan-upchar-bachav-ilaj-dawa-in-hindi.webp
  • ललित

समारोह

सुभाषचंद्र टेकडपांडे जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

पुन्हा एक समापन, पुन्हा एक सुरुवात

वैभव शिरखेडकर जुलै 31, 2026 0
gumohor-water
  • ललित

जुनी पाने

शिवानी बलकुंदी जुलै 31, 2026 0
सर्वाधिकार © साहित्य लेखक | MoreNews by AF themes.
बातमीपत्राचे सभासद व्हा
आणि प्रत्येक नव्या लेखाची सूचना आपल्या इमेल इनबॉक्स मधे मिळवा.
सभासद झाल्याने तुम्ही आमच्या गोपनीयता धोरणास मान्यता देत आहात याची नोंद असू द्या.