सबलातील युद्ध “दंद्व”!!
२०. ०१. २०२५
✍️ हेमंत नाईक
“दंद्व” या शब्दाची ओळख मला लहानपणीच झाली. माझी आजी महाभारत कथा अत्यंत रंगवून सांगत असे. शेवटी तिने भीम आणि दुर्योधन यांच्यातील दंद्व युद्धाचीची गॊष्ट सांगितली तेव्हा ” जे फक्त्त दोघात होते ते दंद्व ” असं समजावून सांगितले होते.
हल्ली लहानपणीच पेपा पिग, टॉम जेरी, असे अनेक कार्टून उपलब्ध आहेत अगदी रामायण, वीर हनुमान आदी चलचित्र आई वडील टीव्हीवर लावून देतात त्यामुळे आजी मला गोष्ट सांग हा पूर्वी घरोघरी होणारा हट्ट आता नाहीसा झाल्यासारखा वाटतो.
काळ वेगाने बदलत असतो नविन शोध लागल्याने कधी काळी गळ्यातले ताईत असणारी साधनेही अडगळीत जातात..लहानपणी रेडिओची सुंदर धून ऐकून सकाळची सुरवात होत असे. बुधवारी आठ वाजता बिनाका गीतमालावर सरताज गीत ऐकेपर्यत कान रेडिओला लागले असायचे. असो..
आयुष्यात बऱ्याच वेळा करण्यासाठी खूप पर्याय उपलब्ध असतात तेव्हा काय कराव हा प्रश्न मनात येता ते आपण शॉर्टलीस्ट करतो आणि मग जे दोन सबल शेवटी उरतात तेव्हा हे करु के ते?असा प्रश्न म्हणजे “दंद्व”.
समुद्राचे मंथन देव आणि राक्षस यात होऊन नवरत्न निघालीत तसच सकारात्मक आणि नकारात्मक विचाराचे मंथन होता निर्णयाचे नवनीत मिळते. त्यासाठी विचारांचे दंद्व नकळत होत असते.
लग्नासाठी मुलगी पसंत करताना खूप ठिकाणी चहा पोह्याचा पाहुणचार घेऊन ही जोडीदार कोणता निवडावा या निर्णयाप्रत न आलेला माझा एक मित्र शेवटी अविवाहित राहिला. मनात जेव्हा निर्णय घेतांना असा गोधळ होतो तेव्हा चुकीचा वाटत असला तरी निर्णय घेणे महत्वाचे असते नाहीतर हे करू की ते करू यात जीवनात अत्यंत कमी असलेला अमुल्य वेळ मात्र वाया जातो. निर्णय विचारपूर्वक करावा आज जो योग्य वाटतो तो आपण घेत असतो भविष्यात बऱ्याच वेळा कधी अचूक वाटणारे बिर्णय चुकीचे ठरतात किंवा त्यावेळी नाईलाज म्हणून घेतलेले चुकीचे वाटाणारे निर्णय पुढील आयुष्य सुखाचे करतात.
अर्जुनाला जेव्हा असाच युद्ध भूमीवर आप्ता विरुद्धध लढू की नको हा प्रश्न आला तेव्हा श्रीकृष्ण त्याच्या मदतीला आले त्याचे मनातले सर्व प्रश्नाचे निरसन केले.. एखाद्या निर्णयाप्रत पोहचणे म्हणजेच कृष्णत्व किंवा त्याला पूर्णत्व असे म्हणूया!!
मनातल्या विचाराचे दद्वाचे अचूक उत्तर तुमच्या अंतर्मनातच दडले आहे त्या साठी फक्त्त स्वतः पासून दूर जाऊन विचार करायची गरज आहे.
सासु सुनेच्या वादात कोण बरोबर हे सांगणही पुरुषास कठीण असतें.. इकडे आड आणि तिकडे विहीर अशी स्थिती होते बिचाऱ्याची! एका बाजूस आई तर दुसऱीकडे सहचारिणी अशा वेळी हुशार मंडळी मौन बाळगतात..कारण तो क्षणिक वाद मिटूनही जातो. तर काही मंडळी दोघीनाही तू कशी बरोबर किंवा चूक आहे हे एकांतात सांगतात. उघडपणे कोणाचीही बाजू घेणे चुकीचे ठरते.कारण असे करून तो नकळत दुसरीला दुखावत असतो.
विचारांची अनेक दंद्व मनात असल्यामुळे लेखन होते साधक बांधक विचार करणे हाही एक दंद्वाचा भागच आहे. कालच हिमाचलात महाभारतातील खलनायक दुर्योधनचें एकमेव मंदिर असल्याचे वाचनात आले.. त्याचे नजरेने बघितल्यास महाभारत वेगळेच असू शकते. विजेता इतिहास लिहीतो असं म्हणतात.असो.
दंद्व..
काय करू? काय नको?
आयुष्यभराचा हा प्रश्न..
अविरत विचार थकवे ,
मनात न थांबणारे दंद्व..
दोन सबलातील संघर्ष,
युद्ध नसे ते असे दंद्व..
हार जीत कोणा एकाची,
शक्ती युक्तीचा लागे कस..
मन दंद्वाचे सदा आगर,
भावभावनांचा कल्लोळ..
निर्णयाने फक्त्त मात्र
पूर्णत्व होतसे ते प्राप्त..
विचार मनात असतानेक,
भंगते तयाची एकाग्रता..
मन कोरे मात्र असताना ,
मोदाने रंगते रसग्रहणता..
नावडते कर्म करताना,
मन होते दुःखीकष्टी..
आनंदात ते डुबकी मारे,
जेव्हा आवडे त्यास गोष्टी..
सन्माना सर्जनाची निवृत्ती,
नृत्य नर्तकांचे संध्याकाळी..
नर्तकाऐवजी झालो सर्जन,
त्या मनाचे अश्रू आले डोळी..
मन आतुर गाठण्यास
जेव्हा काही दूर असे ते ..
साध्य सहज प्राप्त होता,
कंटाळा मनास वाटे..
मना समजणें अवघड ,
साधना त्या प्राप्तीसाठी..
स्वतः पासून दूर होऊन,
साधा ती..म्हणते विरक्ती..
आवडेल ते , तुम्ही कराहो ,
जरी लोक म्हणतील वेडा..
मुक्तीचाच मार्ग खरा तो,
सर्वांसाठी अचूक हा धडा..